वन मंत्री संजय राठोड हे टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच राज्यातील जनतेसमोर मंगळवारी येत आहेत. समस्त बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे ते दर्शनाला जातील आणि त्याच ठिकाणी ते पत्रकारांशी संवाद साधतील अशी शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या संजय राठोड यवतमाळमध्ये कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात शासकीय बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर ते सहकुटुंब पोहरादेवीला रवाना होतील. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते.
पूजा चव्हाण ने सात फेब्रुवारी रोजी पुणे येथे आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे समोर आले. एकेक घटनाक्रम पुढे आला आणि संजय राठोड यांचे नाव पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात प्रकर्षाने समोर आले. तेव्हापासून राठोड हे जनतेसमोर आलेले नाहीत. एकाही आरोपाचे त्यांनी उत्तर दिले नाही व खुलासादेखील केलेला नाही. पुणे पोलिस या आत्महत्येची चौकशी करीत आहेत.
पूजा चव्हाण च्या आत्महत्या ला जोडून काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या कथित मंत्र्याचा आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. चित्रा वाघ तसेच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हाकलावे अशी मागणी केली होती.
मात्र आधी फाशी की आधी चौकशी असे सांगत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संजय राठोड यांचा बचाव केला होता. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवारयांनीही चौकशीशिवाय एखाद्या व्यक्तीला शिक्षा देणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका घेतली होती.