त्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या आरोपांबाबत गृहमंत्र्यानी केला खुलासा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे, महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी सरकार समोरील अडचणी, दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी, काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, सरकारची बाजू लढवत ठेवून, अनिल देशमुख यांचा बचाव करत, सरकारचे उघडेपण सावधपणे झाकण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांनी, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना, ‘पत्रकार परिषदेआधी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेण्यात येईल. अनिल देशमुखांच्या पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र गृहमंत्र्यांचं याबाबत म्हणणं देखील ऐकून घेतलं जाईल. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या बाबतचा निर्णय सरकारमधल्या सर्व घटक पक्षातल्या वरिष्ठांशी चर्चा करूनच घेण्यात येईल.’ असे सांगितले. तसेच, आज या सर्व प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याचेही त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत पवारांनी काही नवीन पुरावे प्रसारमाध्यमांसमोर ठेवले. ‘अनिल देशमुख हे कोरोनामुळे ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते, तसेच १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होते, असा दावा पवार यांनी केला. मात्र त्यांचा हा दावा खोडून काढताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करत १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला. यामुळे परत एकदा शंका-कुशंकांनी डोके वर काढले होते. त्यावर आता खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, ‘कोरोनाचे झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. मला १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना, तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. कोविडमुळे थकवा आल्याने माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून, मी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. गृहमंत्र्यानीच आता याबाबत खुलासा केल्याने तूर्तास तरी हा मुद्दा संपलेला आहे. दरम्यान, विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या चौकशीची आणि राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणावरून आज राज्यसभेत व लोकसभेतही गदारोळ झालेला पाह्यला मिळाला.

Read Also 

Recent News