पुणे : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या एकीकडे सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ५ एप्रिलपासून नवे करोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असून, या लॉकडाऊन सदृश परिस्थितीला घेऊन नागरिकांमधून संमिश्र भावना उमटत आहेत.
दरम्यान, ‘महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या आढळणाऱ्या शहरांपैकी पुणे देखील असून, पुणे महापालिकेची, शहरांमधील नवीन आर्थिक वर्षातील सर्व विकासकामे आणि मेट्रो वर होणारा खर्च थांबवून, तो सर्व पैसा पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर आणि आरोग्य सेवेची संलग्न यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादीच्या विजय डाकले, पुणे शहराध्यक्ष्य, सामाजिक न्याय विभागाकडून पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून एक पत्र, पालकमंत्र्यांना दिले गेले असून यात, ‘करोना महामारीमुळे पुणे शहरांमधील आरोग्यसेवा पूर्णतः कोलमडली आहे. पुण्यात रोज करोना बाधितांचा आकडा वाढतच असून, रुग्णांना बेड मिळत नाही, व्हेंटिलेटरची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कितीही निधी दिला, तरी पुण्यातील सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार यामुळे पुण्यात करोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे,’ असे म्हटले आहे.
तसेच, ‘पुण्यातील सत्ताधारी भाजपा पुणेकरांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा देण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे. पुणेकर नागरिकांना चांगली आरोग्य सेवादेण्या ऐवजी, सत्ताधारी आंदोलने, कायदेभंग आणि ठेकेदारांकडून मिळणाऱ्या मलईसाठी काम करत असल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोपदेखील या पत्रकातून सत्ताधारी भाजपवर करण्यात आला आहे.
त्यामुळे, नवीन विकास कामे चालू न करता, सध्याच्या परिस्थितीत आवश्यक ती आणि गरज असतील तीच कामे चालू ठेवावीत आणि इतर विकास कामांमधला निधी, पुणेकरांच्या आरोग्यसेवेवर आणि त्यांच्याशी संलग्न यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा, तसेच, सध्याच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचा जीव महत्त्वाचा आहे हे लक्षात घेता, राज्य सरकारने त्वरित पुणे महापालिकेला नवीन वर्षातील विकासकामे आणि मेट्रोची काम थांबवून, त्यातील निधी आरोग्यसेवेवर खर्च करण्याबाबत आदेश द्यावेत, अशा प्रकारची विनंती करण्यात आली आहे.