परभणी: गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात शिवसेनेला कधीही यश मिळाले नव्हते. परंतू यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडे राजेश पाटील गोरेगावकर यांच्या रुपाने उपाध्यक्षपद आल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने शिवसेनेचे सहकार क्षेत्रात पदार्पण झाल्याची चर्चा आहे. खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील यांच्या प्रयत्नातून हे यश मिळाल्याचे बोलले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक निवडणुकीत आमदार सुरेश वरपुडकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोन नेत्यांच्या भोवतीच राजकारण फिरत राहिले आहे. कधी बोर्डीकरांनी वरपुडकरांना मात दिली तर कधी वरपुडकर बोर्डीकरांवर भारी पडले. असे असले तरी या दोघांच्या पलीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण कधी गेलेच नाही.
जिल्ह्यात सर्वाधिक ताकदवान पक्ष असलेल्या शिवसेनेने याआधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे संचालक जरी असले तरी तो संचालक कधी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर पोहचलाच नाही. यावेळी ही तीच परिस्थिती निर्माण झाली होती. सुरेश वरपुडकर यांच्या गटाचे १० तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाचे ९ संचालक निवडून आले होते. त्यामुळे वरपुडकर गटाचा अध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात होते. परंतू निकालाच्या दिवशीच आमदार बाबाजानी दुर्राणी यांना अध्यक्षपद खुनावू लागले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार संचालकांना कुणीही गृहित धरू नये अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.
राष्ट्रवादीच्या गटाचे चार उमेदवार निवडूण आल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत बाबाजाणी दुर्राणी यांची भूमिका महत्वाची ठरणार होती. परंतु पुन्हा आपल्या कुणीही गृहित धरू नये, असे म्हणत त्यांनी बोर्डीकर आणि वरपुडकर गटाला सूचक इशारा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काही तरी चमत्कार घडतो की काय? अशी चर्चा सुरू होती. पण दुर्राणी यांनी आघाडी धर्म पाळत वरपुडकर गटालाच मदत केल्याचे त्यांच्या बिनविरोध झालेल्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे .