मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केले. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी देखील चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी रुग्णसंख्या वाढण्यामागे परराज्यातून येणारी लोक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत आणि त्या राज्यांमध्ये करोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात तिथे कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. #RajThackeraylive
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2021
दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारकडे अनेक मागण्या देखील केल्या. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी. राज्यात ज्या काळात लॉकडाऊन आहे. त्या काळात सरसकट वीजबिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.