मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे बेडस् व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून, नागरिकांकडून निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने, येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा का, यावर चर्चा केली. त्यावेळी, होळी आणि रंगपंचमीनंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत जास्त वाढ होण्याची भीती असून, या पार्श्वभूमीवर सरकारने ही तयारी सुरू करावी असे मत सर्वानी व्यक्त केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची योजना आखण्याचे आदेश दिलेले आहेत.
या संदर्भात त्यांनी काही सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा. प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी. विशेषत: वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
तसचं राज्यात करोना प्रतिबंधक विषयक नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून, १५ एप्रिल पर्यंत राज्यात त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात रविवारपासून जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून, ५ जणांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.