पुणे: महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. सरकार वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे अडचणीत आले आहे. केंद्र सरकार कमी प्रमाणात लसींचा पुरवठा करतंय असं महाराष्ट्र सरकार सांगत आहे. त्यातच आता कडक निर्बंधांवरून आता प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार विरोधात टीकेची झोड उठवली आहे. अमित शहा काय देशाचे मालक नाही , प्रत्येकजण मालक आहे . तुम्ही फक्त खुर्चीवर आहेत . त्यांची चर्चा काय झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आला हे महत्त्वाचे आहे असाही टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे पुण्यात डॉ . प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कठोर निर्बंधांसह विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप ‘कॉपी कॅट’ आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की इथ कित्येक लोकांचे हातावर पोट आहे. जर काम केले तर त्या कामाची मजुरी मिळणार आणि घरात चूल पेटणार असा खूप मोठा समाजातील गरीब घटक महाराष्ट्रात आहेत. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? असा प्रश्न देखील त्यांनी महाराष्ट्रातील सरकारला उद्देशून विचारला आहे.
पश्चिम बंगाल, आसाम याठिकाणी विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. मोठ्या मोठ्या सभा, रोड शो चालू आहेत. लोक सोशल डिस्टंसिंग किती प्रमाणात पाळत आहेत असा प्रतिप्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे. सरकार लॉकडाऊन बाबत वंचितसोबत बोललेले नाही, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही. दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही अशा शब्दात आंबेडकरांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.