औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा बँक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीच्या दरम्यान औरंगाबाद मधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पद हे दोन्ही शिवसेनेलाच गेले मात्र तरीही शिवसेनेत या निवडणुकी दरम्यान दुफळी निर्माण झाली आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे यांच्यावर कुरघोडी करत आपला माणूस उपाध्यक्ष केला. ऐरवी सगळ्या ठिकाणी जिल्हाप्रमुख म्हणून हस्तक्षेप करणारे आणि भूमिका बजावणारे अंबादास दानवे काल का निघून गेले? मी कुणालाही घाबरत नाही अशी डरकाळी फोडणारे दानवे सत्तारांना घाबरले का? असा टीकेचा बाण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर सोडला आहे.
सत्त्तारांचे एकहाती वर्चस्व
जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक शेतकऱ्यांचे मंदिर आहे इथे राजकीय जोडे बाहेर ठेवून आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असा दावा, शिवसेनेचे मंत्री भुमरे, सत्तार, आमदार दानवे यांनी शेतकरी विकास पॅनल तयार केले, त्यावेळी केला होता. परंतु काल झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेत दुफळी झाल्याचे दिसून आले . नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपाध्यक्ष पदावरून चांगलेच नाट्य घडले. डोणगांवकरांच्या बाजूने असलेल्या भुमरे, दानवेंना बाजूला सारत सत्तार यांनी विरोधी पॅनलचे प्रमुख काळे व माजी आमदार सुभाष झांबड यांची मदत घेत अर्जुन गाडे यांना उपाध्यक्ष केले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या मुद्द्याला हात घालत आता आमदार अंबादास दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला सोबत घेऊ नका, महाविकास आघाडीचा धर्म पाळा, असे मी म्हणत होतो. पण त्या तिघांनी माझे ऐकले नाही. मनमानी केली, मातोश्रीवर जाऊन नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. काल झालेल्या अध्यक्ष आणि त्यानंतरच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून या तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय नव्हता हे समोर आले आहे.