मुंबईचे नवे पोलीस आयुक्त राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना आले उधाण

मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून परमबीर सिंग यांच्या जागी, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, काहीच दिवसांनी मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र, मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता. यावरून सध्या राज्याचे वातावरण तापून निघालेले आहे.

दरम्यान, अनेक अनुत्तरित प्रश्नांनी या सर्व प्रकरणाला वेढले असून, राज्यातल्या तपास यंत्रणांपासून ते केंद्राच्या तपास यंत्रणापर्यंत, सगळ्याच यंत्रणा या सर्व प्रकरणाची उकल करण्यामागे लागलेल्या आहेत. सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांची अक्ष्यम्य चुकांमुळे उचलबांगडी, या साऱ्या प्रकरणांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दुसरीकडे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासात देखील सबळ पुरावे एटीएसच्या हाती लागले असून, या प्रकरणाची आता लवकरच उकल होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, आज परमबीर सिंगांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातच राज्यपाल भवनाने ट्विट करून, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी, सदिच्छा भेट घेतल्याचे ट्विट केले आहे. राज्यपालांनी नगराळेंशी काय चर्चा केली, हे समजले नसले तरीदेखील, सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लागलेले आरोप आणि परमबीर सिंगांचा सचिन वाझे प्रकरणात असलेला सहभाग आदी मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

राज्यात आणि खासकरून मुंबईत, एकूणच कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने वातावरण संवेदनशील झाले आहे. या सर्व प्रकरणावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा, हे सरकार बरखास्त करावे, या प्रकारच्या अनेक मागण्या विरोधकांकडून करण्यात येत आहेत. यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ 24 मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार आहे. परंतु, त्याआधीच मुंबईच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Recent News