यवतमाळ – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं संजय राठोड म्हणाले.
तसेच मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो, त्यांना सांभाळण्याचं काम केलं, आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल, अरूण राठोड कोण मला माहिती नाही, सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत, माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात, सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे, एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे.