मुंबई : मनसेचे ठाण्यातील पदाधिकारी जमील शेख यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नजीब मुल्ला यांचे नाव समोर आले असून, या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, याबाबत लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या आरोपीने राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली होती. राज ठाकरे यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त केला.
राज ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. ह्याच मुल्लाचं नाव ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या हत्या प्रकरणातही आलं होतं. ते प्रकरण केव्हाच रफादफा करून गेलं आहे. आता पुन्हा त्याचं नाव आलंय. राज्य सरकार या प्रकरणात काय कारवाई करणार याची वाट मी बघतोय. पण मी स्वत: लवकरच शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे
या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी शरद पवार यांची भेट घेणार आहे. अशी जर मंडळी यांना पक्षात सांभाळायची असतील तर दुसऱ्यांचे हात काही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही. या माणसाला अटक होणं आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे.