पंढरपूर : पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे समाधान आवताडे यांच्या विजयासाठी भाजपचे अनेक आमदार पंढरपूरात तळ ठोकून आहेत.
पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे सुद्धा मैदानात उतरले असून, समाधान आवताडे यांच्यासाठी त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांनी प्रचार केला.
याआधी सोलापूर जिल्हा भाजप प्रभारी आणि माजी आमदार बाळा भेगडे देखील अनेक दिवसांपासून पंढरपूरात आहेत. कोरोना व्हायरस महामारीचा परिणाम देखील प्रचारावर पाहायला मिळत आहे. मोहिते-पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर महेश लांडगे यांनी सुद्धा अँटिजन टेस्ट करून घेतली. चाचणी नेगेटिव्ह आल्याने लांडगे पुन्हा एकदा प्रचाराला लागले आहेत.
महेश लांडगे यांच्याकडे मंगळवेढा भागाची जबाबदारी देण्यात आली असून, ते आवताडेंच्या विजयासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. दरम्यान, 17 एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून, 2 मे रोजी निकाल समोर येतील.