पंढरपूर: पंढरपुरात राजकारण चांगलेच रंगात आले आहे. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर होणाऱ्या पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाकरता पोटनिवडणूक होत आहे. कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात होत असताना पंढरपुरात प्रचार सभांचा धडाका सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,कल्याणराव काळे पाटील, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रचार सभा महाविकास आघाडी तर्फे होणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. दोंन्ही बाजुंनी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघावर आपल्याच पक्षाचा झेंडा कसा फडकणार याकडे लक्ष दिले जात आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार भारतनाना भालकेंनी आजारी असतानादेखील आपली आमदारकी पणाला लावली. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने भालके यांना श्रेय नको; म्हणून या योजनेतील 15 गावे आणि 1 टीएमसी पाणी कमी करण्याचे पाप केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत भालके बोलत होते. या वेळी नंदकुमार पवार, लतिफ तांबोळी, भारत बेदरे, तुकाराम कुदळे, तुकाराम भोजने, बंडू गायकवाड, मारुती वाकडे, सुरेश कोलेकर, मुरलीधर सरकले, संतोष पवार, दौलत माने आदी उपस्थित होते.
भगिरथ भालके म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी स्व. आमदार भारतनानांनी मंगळवेढा उपसा सिंचन मार्गी लागावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे या योजनेला निधी देण्यास टाळाटाळ केल , त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. उच्च न्यायालयाने निधी देण्याचे आदेश देऊनही शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने निधी दिला नाही. तसेच, या योजनेतील 15 गावे व एक टीएमसी पाणी कपात करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे भूमिपूत्र म्हणून मते मागत आहेत, मग ही वगळलेली 15 गावे काय पाकिस्तानातून आले आहेत काय? त्याबद्दल मूग गिळून गप्प बसत आहेत असे आरोप देखील त्यांनी केले आहेत.