पंढरपूर: महाराष्ट्र्रात वाढत्या कोरोना आणि वाढत्या उन्हासोबतच राजकारणाने देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पंढरपूर-मंगळवेढा साठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता मोठ्या मोठ्या नेत्यांचे राजकीय दौरे सुरु झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड .प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच पंढरपूर-मंगळवेढ्याचा दौरा केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे . पंढरपूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप या पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी नाकारून प्रस्थापितांना तिकीट दिले आहे . त्यामुळे धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मधुकर मोटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणावे. बिरप्पा मोटे हे धनगर समाजाचे असून ते निवडून आल्यास धनगरांच्या प्रश्नांना वाचा फोडतील. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
धनगर समाजातील काही प्रतिष्ठित मंडळी भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेले होते. मात्र त्यांनाही तिकीट देण्यात आले नाही . हे तिकीट प्रस्थापितांना देण्यात आले. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या पक्षापासून धनगर समाजाने वेळीच सावध व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे . पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे धनगर समाजाचे उमेदवार वीरप्पा मोटे हे उभे असून त्यांना निवडून द्यावे , अशी विनंती बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत टीका केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा मेळावा पंढरपुरात घेण्यात आला होता. त्या वेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण न देता धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली. अशीच फसवणूक काँग्रेस , राष्ट्रवादी व आताचे सत्ताधारी पक्ष करीत आहेत. आरक्षण देतो, असे सांगितले. मात्र, गेली पाच वर्षे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आता एकटा पडला आहे , असे वक्तव्य ऍड.. प्रकाश आंबेडकर यांनी केले.